• ( 02422 ) 246491 , 246492.
  • ashokssk_anr@ashoksugar.com

अशोक कारखाना स्थापनेचा इतिहास व वाटचाल

सन १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले.याच सुमारास देशात सहकारी साखर कारखानदारीचा जन्म झाला. अहमदनगर जिल्ह्याने देशात साखर कारखानदारीचे पर्व सुरु केले. देशातील पहिला साखर कारखाना हरेगाव येथे सन १९२० मध्ये तर टिळकनगर येथील महाराष्ट्र शुगर मिल्स हा दुसरा खाजगी कारखाना १९२६ मध्ये सुरु झाला. जेष्ट अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ यांचा विचारधारेतून आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नातुन प्रवरानगर येथे देशातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा ठाकला. देशात सहकारी साखर कारखानदारीचे पर्व सुरु झाले.

श्रीरामपूर तालुक्यात भंडारदरा धरणाचे पाण्याने शेतीमध्ये क्रांती केली होती. या भागातील जिरायत शेतीचे स्वरूप बदलले आणि उसाची शेती उभी राहिली. दोन खाजगी व एक सहकारी साखर कारखाना असे तीन कारखाने सुरु झाले, मुबलक उसामुळे शेतक-यांनी गुळाचा धंदा सुरु केला. मात्र गुळाला म्हणावे तसे भाव मिळत नसल्याने गु-हाळाचा धंदा तोट्याचा ठरू लागला.

श्रीरामपूरच्या शेजारीच प्रवरानगर येथे सहकारी साखर कारखाना सुरु झाल्याने श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातही अशा स्वरूपाचा सहकारी साखर कारखाना सुरु झाल्यास गुळ धंद्यात अडकलेला शेतकरी बाहेर पडेल आणि उसास शाश्वत भाव मिळू शकेल,असे विचारमंथन इथल्या दूरदृष्टी असणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांमध्ये सुरु झाले.

सन १९५२-५३ च्या सुमारास तालुक्यातील कै.निवृत्ती पा. बनकर, माजी आमदार जगन्नाथ वामनराव बनकर, यशवंतराव बनकर , गणपतराव बनकर (पढेगाव) , माजी आमदार कै .भास्करराव पा. गलांडे ,बाबुराव ताके, विठ्ठलराव नाईक (उंदिरगाव),शंकरराव बापुजी नाईक,वाघुजी बडदे, वसंतराव खंडागळे(बेलापूर), बापूसाहेब डाके, किसनराव आसने (माळवाडगाव), विश्वनाथराव पा.पवार,सोन्याबापू पवार, भिमाजी भागाजी पवार ,ज्ञानदेव पवार(वडाळामहादेव), धोंडू भागाजी औताडे , रंजक मास्तर (माळेवाडी), ज्ञानदेव पा. थोरात (उक्कलगाव ), सखाहरी भोसले, त्र्यंबकराव रंभाजी कोळसे (उंबरगाव), शंकरराव धुमाळ, मारुती भोसले (वळदगाव), बापूसाहेब हिरवे ,डॉ,शरदकुमार आगाशे ,ज.य.टेकावडे ,पुंडलिकराव खिलारी (श्रीरामपूर), विठ्ठलराव भांड (लाडगाव ), पाटीलबा गवारे, विठ्ठलराव गवारे(शिरसगाव ), पंढरीनाथ पटारे(खोकर),हरीभाऊ कवडे(भेर्डापूर),शंकरराव मगर ,यमाजी आहेर ,शंकरराव कोकणे, जनार्दन केशव कापसे (टकाळीभान),बाबासाहेब पवार (निपाणीवडगाव )गोपीनाथ त-हाळ (कारेगाव), वामन राव उंडे, शंकरराव गजाराम उंडे(मातापूर), बाबुराव राधोजी जगताप(घुमणदेव), विठ्ठलदादा भोईटे (भोकर), एकनाथ बाबुराव वाकचौरे, मुरलीधर बालाजी काळे, भानुदास पांडुरंग वाकचौरे, दादा कोंडीराम वरुडे (पुनतगाव), निवृत्ती मोहन नांदे, सीताराम गणपत पा.तुवर,गंगाधर शंकर पाटील,किसन मार्तंड पवार,कुंडलिक नारायण खिलारी,इमाम पाटील (पाचेगाव), त्र्यंबकराव करंडे, भानुदास पा.लबडे (गोंधवणी) आदी तत्कालीन दूरदृष्टीच्या नेते मंडळीनी श्रीरामपूरच्या पूर्व भागात सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना सुरु करण्याचा संकल्प जेष्ट विचारवंत अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या उपस्थितीत केला .

कारखान्याचे प्रवर्तक कै.निवृत्ती बनकर आणि वर नमूद केलेल्या व्यक्ती शेतकऱ्यांचा अशोक कारखान्याच्या उभारणी संदर्भात पहिला औपचारिक मेळावा प्रतापराव पाटील थीएटर(सध्याचे किशोर थीएटर) येथे संपन्न झाला. या मेळाव्यास अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ ,पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील , कोपरगाव तालुक्यातील शंकरराव औताडे तसेच श्रीरामपूर तालुक्यातील प्रमुख व कारखान्याचे प्रवर्तक व्यक्ती उपस्थित होत्या. या मेळाव्यात कारखान्याची भाग भांडवल उभारणी ,कर्जाची उभारणी,कारखान्याच्या जागेची निवड व सर्वेक्षण यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली

या मेळाव्याव्यातिरिक्त लगेचच कारखाना उभारणीच्या दृष्टीने प्रत्यक्ष कार्यवाही सुरु झाली. कारखान्यासाठी प्रथम " कारेगाव " शिवारात जागेची निवड करण्यात आली. याच जागेच्या नावावरून कारखान्याचे " कारेगाव भाग सहकारी साखर कारखाना " असे बारसे झाले. कारखान्याच्या शेअर्सची किंमत रु.१,००० /- अशी ठरविण्यात आली. आणि पहिल्या हफ्त्यापोटी तत्कालीन स्थिती ध्यानात घेऊन प्रती शेअर रु.२५१/- पहिल्या हफ्त्या प्रमाणे रक्कम जमा करण्याचे ठरले. त्यानुसार पैशाच्या उभारणीचे काम जोमाने सुरु झाले. श्रीरामपूर तालुक्यातील ३३ व नेवासा तालुक्यातील ४ अश ३७ गावांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले. व या गावातील शेतक-यांमधून शेअर्सची रक्कम गोळा करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्या वेळी जिल्हा बॅंका अस्तीत्वात नव्हत्या. शे अ र्स ची उपलब्धता करून दिली. सन १९५४ मध्ये कारखायाची अधिकृत नोंदणी झाली.

नोंदणी नंतर कारखाना उभारणीच्या कामाकडे लक्ष्य देण्यात आले. सदरचे कामासाठी गोडबोले-काणे (गोका कंपनी) यांची आर्कीटेक्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली. कारखान्यासाठी जर्मन कंपनीची माशिनिरी मागविण्यात आली. दरम्यान कारेगाव हे ठिकाण रेल्वे मार्गापासून आणि रेल्वे स्टेशन पासून दूर असल्याने भविष्यात साखर विक्री व वाहतुकीच्या दृष्टीने सदरचे ठिकाण योग्य ठरणार नाही या दूरदृष्टीच्या हेतूने कारखान्याच्या जागेत नंतर बदल करण्याचा निर्णय सर्वंकष विचारांती घेण्यात आला आणि निपाणीवाडगाव रेल्वे स्टेशननजीकच्या जागेत कारखाना उभारण्याचे निश्चित झाले. सध्या याच जागेवर कारखाना उभा आहे.

कारखान्याच्या नोंदणी नंतर शासनाने शासननियुक्त प्रतिनिधी मंडळाची नियुक्ती केली. या शासन नियुक्त बोर्डाचे पहिले चेअरमन म्हणून श्री. आर. जी. काकडे यांची नियुक्ती करण्यात आली. अशा तऱ्हेने श्री. आर जी. काकडे हे कारखान्याचे पहिले चेअरमन ठरले. या शासन नियुक्त पहिल्या जनरल बॉडीत आठ सदस्य होते. यात सर्वश्री विठ्ठलराव विखे पाटील, निवृत्तीभाऊ बनकर, बाबुराव जगताप , विठ्ठलराव भांड , शंकरराव नाईक, यमाजी आहेर, गोपीनाथ त-हाळ यांचा समावेश होता .या मंडळाने कारखाना उभारणीच्या म्हणजे ८/१/१९५५ ते ३०/१०/१९५८ पर्यंत कारभार सांभाळला.

कारखाना उभारणीचे काम काज सन १९५४-५५ मध्ये सुरु झाले.सुरुवातीला जर्मन कंपनीची (जी.एच.एच.) प्रतिदिन ८०० मे.टन क्षमतेची मशीनरी उभारण्यात आली. सिव्व्हील इंजिनिअर श्री. देशमुख यांनी कारखान्याच्या बांधकामाची देखभाल केली. सन १९५७ मध्ये कारखाना उभारणीचे काम केवळ तीन वर्षात पूर्ण झाले. २० नोव्हेंबर १९५७ रोजी कारखाना उस गळीतासाठी आणि साखर उत्पादनासाठी सज्ज झाला.

९ डिसेंबर १९५७ हा दिवस श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतक-यांच्या अथक परिश्रमाला फल देणारा आणि स्वप्नांची पुरती करणारा ठरला. या दिवशी कारखान्याचे 'चक्र' हालले.आणि पहिल्या गळीत हंगामाचा स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर व्यवस्थापक श्री.पी. पी. भट्टाचार्य यांचे शुभ हस्ते शुभारंभ झाला.

सन १९५८ मध्ये कारखान्याची पहिली निवडणूक संपन्न झाली . या निवडणुकीत सभासदांनी मतदानाव्दारे कारखान्याचे पहिले संचालक मंडळ निवडले .या संचालक मंडळाने निवृत्तीभाऊ बनकर यांची चेअरमनपदासाठी एकमताने निवड केली. सन १९५७-५८ च्या गळीत हंगामा नंतर जर्मन पद्धतीची प्रतिदिन ८०० मे.टन क्षमतेची मशिनरी बदलण्यात येवून त्या जागी मद्रासच्या के.सी.सी. या स्वदेशी कंपनीची प्रतिदिन १२५० मे.टन क्षमतेची मशिनरी बसविण्यात आली.

सन १९५९ मध्ये चेअरमनपदाची धुरा निवृत्तीभाऊ बनकर यांचेकडून माजी आमदार कै. भास्करराव पाटील गलांडे यांचेकडे आली. कै.भास्करराव पा.गलांडे यांनी सन १९५९-१९७३ अशी तब्बल १४ वर्ष कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. कारखान्याच्या प्रारंभीच्या अवस्थेत दूरदृष्टीने निर्णय घेऊन कारखान्यात विकासाची वाटचाल गतिमान केली. त्यांच्या काळात सन १९६५ मध्ये कारखान्याच्या गाळप क्षमतेत प्रतिदिन १००० मे.टनावरून १५०० टनापर्यंत वाढ करण्यात आली. त्या नंतर पुन्हा गाळप क्षमता वाढविण्याचा सन १९६८ मध्ये निर्णय घेण्यात आला.या निर्णयानुसार सन १९६८ मध्ये दैनंदिन गाळप गाळप क्षमतेत १५०० मे.टनावरून २६०० मे.टनापर्यंत वाढ करण्यात आली. असे विस्तारीकरणाचे महत्वाचे निर्णय कै.गलांडे यांचे काळात झाले.कारखान्याला कै.गलांडे पाटील यांच्यासारखे नि:स्वार्थी त्यागीवृत्तीचे आणि शेतकऱ्यांच्या हिताची काळजी करणारे नेतृत्व लाभले हा कारखान्याच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे.

पुढे सन १९७३ मध्ये काळाच्या ओघात कारखान्याच्या नेतृत्वात बदल झाला. चौदा वर्षे समर्थपणे नेतृत्व देणाऱ्या गलांडे पाटील यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन पाटबंधारे मंत्री श्री.गोविंदराव आदिक या नव्या दमाच्या नेतृत्वाकडे सभासदांनी कारखान्याचा कारभार सोपविला. श्री.आदिक यांनी सन १९७३ ते १९८३ असे दहा वर्षे कारखान्यास नेतृत्व दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण विकास प्रतिष्ठान ,टाकळीभान टेलटॅक ,मुठेवाडगाव टेलटँक कारखाना कार्यक्षेत्रात उपसा जलसिंचन योजना अशी महत्वाची कामे झाली.

सन १९८३ ते १९८७ हा काळ प्रशासकीय काळ ठरला.या काळात ता.१९/०३/८३ ते १८/०३/८४ प्रशासकीय मंडळ नियुक्त झाले. प्रशासकीय मंडळाचे चेअर मन म्हणून भास्करराव पा. गलांडे यांची तर त्या वेळचे प्रादेशिक उपसंचालक (साखर)अहमदनगर श्री.के. ए. सुदर्शन व प्रांताधिकारी श्री. एस. एस. झेंडे यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली. नंतर श्री. के. ए. सुदर्शन, श्री. एस. ए. मोरे, श्री. डी. एल. सिडाम यांनी प्रशासक म्हणून काम पहिले.सन १९८६ मध्ये श्री. डी. एल. सिडाम यांनी प्रशासक म्हणून काम पहिले. सन १९८६ मध्ये प्रशासक श्री.सिडाम यांनी कारखान्याची एक मिल विकून टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार प्रतिदिन १००० मे. टन क्षमतेची मिल विकण्यात आली.त्यामुळे तेथून पुढे कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन २६०० मे.टनावरून पुन्हा प्रतिदिन १५०० मे.टन इतकी झाली.

सन १९८७ साली प्रशासकीय कालखंडाची अखेर झाली. कारखान्याची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सभासदांनी पुन्हा नव्या नेतृत्वाकडे कारखान्याची सूत्रे देण्याचा निर्णय मतदानातून प्रत्यक्ष उतरविला. व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट असलेले तत्कालीन आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास टाकून त्यांचेकडे कारखान्याचा कारभार सोपविण्याच्या निर्णयावर बहुमताने शिक्कामोर्तब केले . सन १९८७ हा कालखंड कारखान्याच्या सुवर्णमयी वाटचालीतील तिसरा महत्वाचा आणि निर्णयक टप्पा मनाला जातो.ते कशामुळे हे सन १९८७ ते आजवरच्या २६ वर्षाच्या श्री.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने केलेल्या वाटचालीतून दिसते.