• ( 02422 ) 246491 , 246492.
  • ashokssk_anr@ashoksugar.com
Founder

मा. कै. निवृत्तीभाऊ बनकर
माजी.चेअरमन

अशोक सहकारी साखर कारखाना हा स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या पहिल्या टप्यातील कारखाना. प्रवरा सहकारी साखर कारखान्याची स्थापन झाली. त्याकाळी श्रीरामपूर हे गु-हाळाचे प्रमुख केंद्र तसेच गुळाची मोठी बाजारपेठ होती.

सन १९५२-१९५३ च्या सुमारास कै.निवृतीभाऊ बनकर, कै.भास्करराव गलांडे पाटील अशा दूरदृष्टीच्या लोकांनी सहकारी साखर कारखाना उभारणीची अवश्यकता ध्यानात घेतली. यासंदर्भात कै. निवृतीभाऊ बनकर यांनी तालुक्यातील ऊस उत्पादकांना प्रेरणा दिली. गावोगाव बैठका घेऊन सहकारी साखर कारखान्याचे महत्व पटवून दिले. हळूहळू त्यास अनुकूल प्रतिसाद मिळू लागला.

कै. निवृतीभाऊ बनकर एका अर्थाने कारखान्याचे आद्यप्रवर्तक ठरले. त्यांनी पुढाकार घेऊन श्रीरामपूर येथील तत्कालीन प्रभात थिएटर (सध्याची किशोर टॉकिज) येथे मेळावा घेतला. या मेळाव्यास अर्थतज्ञ कै.धनंजय गाडगीळ, पद्मश्री विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले. याच मेळाव्यात श्रीरामपूर जवळच्या परिसरात साखर कारखान्याची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार कारखान्यासाठी भागभांडवल जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली. श्रीरामपूर तालुक्यातील ३३ व नेवासा तालुक्यातील ४ गांव असे ३७ गावांचे कार्यक्षेत्र ठरले. कै.निवृतीभाऊ बनकर, कै.भास्करराव पा.गलांडे (माजी आमदार) यांनी गावोगावी मेळावे घेवून शेअर्सची रक्कम जमा केली. सन १९५४ मध्ये कारखान्याची अधिकृत नोंदणी झाली.कारखान्याचे कारेगाव भाग सहकारी साखर कारखाना असे नामकरण झाले. सन १९५४ ते ५५ या दरम्यान जर्मन कंपनीच्या सहकार्याने प्रतिदिन ८०० मे.टन क्षमतेची मशिनरी उभारण्यात आली. ३ वर्षात कारखाना उभारणीचे काम पूर्ण झाले. २० नोव्हेंबर १९५७ रोजी कारखाना साखर उत्पादनासाठी सज्ज झाला. हा दिवस गोड झाला.

९डिसेंबर १९५७ रोजी कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचे चाक फिरले. सन १९५८ मध्ये शासननियुक्त संचालक मंडळ जावून कारखान्याची निवडणूक झाली. सन १९५८ मध्ये कारखान्याचे पहिले संचालक मंडळ अस्तित्त्वात आले आणि सर्वांनी कारखान्याचे आद्य प्रवर्तक कै.निवृतीभाऊ बनकर पाटील यांची चेअरमनपदासाठी एकमताने निवड केली. अशा त-हेने सभासदांनी निवडलेल्या संचालक मंडळाच्या रूपाने कै. निवृतीभाऊ बनकर हे पहिले चेअरमन झाले.

सन १९५८-५९ कै. निवृतीभाऊ बनकर पाटील यांनी चेअरमनपदाची धुरा सांभाळली. या दोन वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय दूरदृष्टीने घेतले. कारखान्याच्या विकासाची आणि तालुक्यातील शेतक-यांचे आर्थिक परिवर्तन पर्व सुरु झाले. या परिवर्तनाचे श्रेय आद्य प्रवर्तक कै. निवृतीभाऊ बनकर व त्यांच्या तत्कालीन सहका-यांना जाते. ३१/१२/१९५८ रोजी कारेगाव भाग सहकारी साखर कारखाना ऐवजी अशोक सहकारी साखर कारखाना असे नामकरण झाले आणि कारखाना कार्यस्थळाचे "अशोकनगर" असे बारसे झाले. अशात-हेने अशोक सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरु झाली.आद्यप्रवर्तक व संचालक मंडळ नियुक्त पहिले चेअरमन कै.निवृत्तीभाऊ बनकर पाटील यांचे २६ नोव्हेंबर १९९७ रोजी निधन झाले. शेतक-यांच्या परिवर्तनाची आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी सुरु केलेल्या प्रवर्तकाच्या पर्वाची अखेर झाली.

कै.निवृतीभाऊ बनकर पाटील यांनी कारखान्याची भक्कम पायावर उभारणी केली म्हणून आज कारखान्याने ५६ वर्षाच्या सुवर्णमयी टप्पा गाठला आहे. या सुवर्णरुपी कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या पर्वात कै. निवृतीभाऊ बनकर व कै.भास्करराव गलांडे पाटील यांची उणीव जाणवते. त्यांचे ऋणातून उतराई होणे शक्य नाही;पण त्यांचे पुण्यस्मरण पिढ्यान् पिढ्या चिरतन राहील कारखाना आज प्रगतीच्या शिखरावर आहे. या वाटचालीत कै. निवृतीभाऊ बनकर व कै.भास्करराव गलांडे पाटील यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. कारण या व्दयींनी शेतक-याच्या मनात स्थान मिळवले आहे.

त्यांचेपासून नव्या पिढीस, नव्या भूमिपुत्रांना प्रेरणा मिळावी या हेतूने कारखान्याचे सध्याचे सुत्रधार माजी आमदार श्री भानुदास मुरकुटे (चार्टर्ड अकौंटंट) अध्यक्ष, ऑल इंडिया डिस्टीलर्स असो नवी दिल्ली यांनी पुण्यस्मरण सोहळ्याची संकल्पना सुरु केली. यामुळे कारखान्याच्या इतिहासातील योगदान देणा-याच्या ऋणातुन मुक्त होण्याचा माजी आमदार श्री भानुदास मुरकुटे यांचा मानस आहे. आज अर्थतज्ञ चार्टर्ड अकौंटंट आणि पाण्याला दैवत,श्रमाला प्रतिष्ठा मानणा-या श्री मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. असे असलेतरी कै. निवृतीभाऊ बनकर व कै.भास्करराव गलांडे पाटील हे ख-या अर्थाने आजच्या प्रगती चे वाटेकरी आहेत.